आपुलकी प्रतिष्ठानच्या सहकार्यातून गोरगरिबांनी लुटला यात्रेचा आनंद!

आपुलकी प्रतिष्ठानच्या सहकार्यातून गोरगरिबांनी लुटला यात्रेचा आनंद!
सांगोला ( प्रतिनिधी )
यात्रेतील छोटे व्यावसायिक व शहर परिसरात पालावर राहणाऱ्या गोरगरिबांनी आपल्या मुला-मुलींसह आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री अंबिकादेवी यात्रेचा आनंद लुटला.
आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या संस्थेच्या सदस्यानी गोरगरीब मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी रविवारी एक आगळावेगळा उपक्रम राबवला. छोटे व्यावसायिक व पालावर राहणाऱ्या नागरिकांना परिस्थितीमुळे स्वतःची तसेच आपल्या मुलांची हौस पूर्ण करता येत नाही. अशा मुलांना व त्यांच्या पालकांना आपुलकीने एकत्र जमा करून पाळण्यात बसण्याची तसेच यात्रेत खाऊ खाण्याची इच्छा पूर्ण केली.
पाळणा मालक कैलास चव्हाण (मोहोळ), भैरव इंगोले (वाढेगाव) व पत्रकार आनंद ( छोटू) दौंडे यांच्या सहकार्यातून लहान मुलांनी व त्यांच्या पालकांनी पाळण्यात बसून यात्रेचा आनंद लुटला. पाळण्यात बसून आल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आपुलकी सदस्य दिनेश खटकाळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त फळे तसेच यात्रेतील प्रसिद्ध असलेली जिलेबी, भजी, लाडू, फरसाण आदी खाऊ वाटप करून या सर्वांचा आनंद द्विगुणीत केला.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव सचिव संतोष महिमकर, महादेव दिवटे, शशिकांत येलपले, रमेश गोडसे, दत्तात्रय नवले, सोमनाथ सपाटे, वसंत माने, प्रमोद दौंडे, अरविंद डोंबे, सिद्धेश्वर झाडबुके, बाळासाहेब देशमुख, गणेश लोखंडे व खटकाळे कुटुंबीय उपस्थित होते.