विकासकामांना स्पीड ब्रेकर नकोत; पाणी, रस्त्यांसह विकास कामांसाठी महायुतीच पाहिजे –ना.जयकुमार गोरे
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाझरे गावात प्रचंड गर्दीत विजयी संकल्प सभा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):
सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही. पाणी, रस्ते, वीज, पायाभूत सुविधा आणि धार्मिक-सामाजिक विकासाची कामे गतीने मार्गी लावायची असतील, तर मजबूत नेतृत्व आणि सत्तेची साथ गरजेची आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवताना विकासकामांमध्ये अडथळे आणणारे ‘स्पीड ब्रेकर’ नकोत, असे ठाम मत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी, रिपाई (आ) महायुतीचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार-सावंत, चोपडी पंचायत समिती गणाचे उमेदवार अजय सरगर आणि राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. सदाशिव दबडे यांच्या प्रचारार्थ नाझरे येथे भव्य प्रचारसभा पार पडली.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “नगरपालिका निवडणुकांपासून अनेक गोष्टी घडल्या; अशा अनुभवांतूनच वास्तव समजते. आमदारकी हे सत्तेचे पद नसून जनतेच्या सेवेचे साधन आहे, हे विद्यमान लोकप्रतिनिधींना माहीत नाही. सांगोल्यात विकासकामांची मोठी गरज आहे. त्यामुळे महायुतीला बळ देणे हीच काळाची गरज आहे. “ज्या गावाला डीपी पाहिजे, त्या गावाला डीपीडीसीतून डिपी दिला जाईल. माण नदीवरील पुलाला मंजुरी देण्याची जबाबदारी मी घेतली असून लवकरच त्याचे काम पूर्ण होईल.”
यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, माझे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. स्थानिक प्रश्न सोडवणे हेच आमचे ध्येय आहे. महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्यावर ‘बाहेरचा उमेदवार’ अशी टीका केली जाते; मात्र पेनूर गावातून येऊन स्व.भाई गणपतराव देशमुख ५५ वर्षे आमदार होते, तेव्हा माझ्यासह कोणीही आक्षेप घेतला नव्हता. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विरोधकांनी काय दिवे लावले आहेत याचा अभ्यास करावा. पाच वर्षे बंधारे पाण्याने भरलेले होते. राज्यात माण आणि कोरडा नदीला कालव्याचा दर्जा मिळवून देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मोठी भूमिका आहे. दुष्काळी सांगोल्याच्या पाण्याच्या प्रश्नाला दिशा मिळाली असून विकासाची गंगा वाहत आहे. महायुतीला दिलेले मत म्हणजे अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल. संधी मिळते तेव्हा जनतेची सेवा केली पाहिजे, असे मत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
या प्रचार सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दत्त मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन डिसेंबरअखेर अडीच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. वीरभद्र मंदिरासाठी ५० लाखांचा सभामंडप, झापाचीवाडी येथील बाळूमामा मंदिराला ‘क’ वर्गाचा दर्जा आगामी डीपीडीसी बैठकीत देण्याचे आश्वासन, चोपडी येथील सिद्धनाथ मंदिराला ‘क’ वर्गाचा दर्जा, ज्योतिबा मंदिराच्या सभामंडपासाठी ४० लाख रुपयांचा निधी तसेच उदनवाडी येथील मुस्लिम कब्रस्तानसाठी निधी जाहीर करण्यात आला.
चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, “चोपडी गटात रस्ते, पाणीपुरवठा, डीपी आणि पाणंद रस्ते मार्गी लावण्याचे काम केले आहे. कोट्यवधी रुपयांच्या वर्क ऑर्डर्स निघाल्या आहेत. अनेक वर्षे सत्तेत असूनही विरोधकांना विकास करता आला नाही; त्यामुळे आता टीका करण्यासाठी मुद्दाच उरलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
या प्रचारसभेला नगराध्यक्ष आनंदा माने, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर पाटील, बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रूपनर, प्रा.वासूदेव वलेकर, बाळासाहेब काटकर, नगरसेवक प्रशांत धनवजीर, नगरसेवक जुबेर मुजावर, नगरसेवक काशिलिंग गावडे, मंडल अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, पँथर सेनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, नगरसेविका तनुजा एरंडे, चोपडीचे सरपंच श्रीमंत सरगर, उपसरपंच पोपटशेठ यादव, शंभू माने, पोपट आलदर, संजय पाटील, औदुंबर खांडेकर, उपसरपंच बंडू केदार, संतोष काळे, नंदकुमार रायचुरे, विनायक बाबर, दगडू बाबर, नवनाथ मगर, सचिन देशमुख, नंदकुमार दिघे, माजी उपनगराध्यक्षा स्वाती मगर, सुरेश चौगुले, प्रशांत वलेकर, पोपट गडदे, सूर्यकांत चौगुले, अमोल पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



