ठेकेदार आणि त्यांच्या मलिदा गँगचा कडलास गटातील जनता बंदोबस्त करणार ; नंदकुमार शिंदे
मुरुम, खडी आणि डांबर खाणारे एक दिवस माण नदी विकून खातील

सांगोला ; तालुका प्रतिनिधी
कडलास जिल्हा परिषद गटातील बहुतांशी सर्व गावे ही माण नदीच्या काठावर वसलेली आहेत. माण नदीच्या काठावर असलेला शेतकरी स्वाभिमानी आणि स्वावलंबी आहे. या कडलास जिल्हा परिषद गटात सध्या वळवळ करणाऱ्या ठेकेदार आणि त्याच्या मलिदा गँगचा येथील स्वाभिमानी जनताच मतपेटीतून कायमचा बंदोबस्त करतील असा विश्वास नंदकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
कडलास जिल्हा परिषद गटात सध्या शिवसेना महायुतीकडून निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार हे ठेकेदार आहेत. या गटातील सर्वसामान्य आणि भोळ्या भाबड्या जनतेला विकास कामांची खोटी आश्वासने देऊन सध्या ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत या ठेकेदार आणि त्यांच्यासोबत असलेल्या मलिदा गॅंगचा पूर्व इतिहास पाहिला असतात त्यांनी कडलास जिल्हा परिषद गटात असणाऱ्या रस्त्याचा मुरुम, खडी आणि डांबर सुद्धा खाल्ले आहे. एवढेच नाही तर या गटासाठी वरदान असणारी माण नदी सुद्धा यांनी लुटून खाल्ली आहे. अशा लोकांना निवडून दिल्यास ते गटातील सामान्य लोकांच्या रानातील मुरूम नव्हे मातीसुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत.
तालुक्यातील नेत्यांच्या कानाभोवती लागून त्यांच्याकडून मोठमोठ्या कामांचे ठेके घ्यायचे लोकांच्या विरोधाला न जुमानता नेते आणि अधिकारी हाताशी धरून निकृष्ट कामे करून सरकारचा कोट्यवधी रुपयांची लूट करायची हाच या ठेकेदार आणि त्यांच्या मलिदा गँगचा एकमेव धंदा आहे. जे लोक नेत्यांची आणि शासनाची दिशाभूल करतात ते जनतेला सहज फसवू शकतात त्यामुळे अशा संधीसाधू आणि फसव्या लोकांना माण नदीच्या काठावर राहणारी स्वाभिमानी जनता धडा शिकवेल असा विश्वास यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
ज्यांनी नेत्यांना आणि शासनाला लुटले त्यांना तुम्ही लुटा
मी एक सामाजिक आणि राजकीय चळवळीत काम करणारा शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या विरोधात निवडणूक रिंगणात उभा असणारे उमेदवार हे पैशाच्या जीवावर लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे असलेला पैसा हा बेइमानीचा आणि भ्रष्टाचाराचा आहे. त्यामुळे ज्यांनी नेत्यांना आणि शासनाला लुटले आहे त्यांना जनतेने लुटा ही लढाईच मुळात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. ठेकेदार आणि मलिदा गँगचा बंदोबस्त करून शेतकऱ्याच्या मुलाला साथ द्या
नंदकुमार शिंदे
मा.पंचायत समिती सदस्य



