सांगोला आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा उपक्रम – अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत

मुंबई प्रतिनिधी:
राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीत एका महिन्याचे वेतन मदत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
ही मदत पूरग्रस्तांच्या घरपुनर्रचना व शेती पुनर्वसनासाठी वापरली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. “सांगोला तालुक्यातील शेतकरी व पूरग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी मी नेहमीच उभा आहे. नैसर्गिक आपत्तीला आपण सर्वांनी मिळून सामोरे जायचे आहे,” असे ते म्हणाले.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगोल्यासह अनेक गावे जलमय झाली आहेत. पिकांचे व पशुधनाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, शासनाने तातडीची मदत जाहीर केली आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबांना ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. देशमुख यांच्या या निर्णयाचे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी स्वागत केले असून, या योगदानामुळे सांगोला तालुक्यातील पूरग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित अर्ज करण्याचे आवाहन केले.



