ढगफुटी झाल्याने त्वरित सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधून नुकसानग्रस्तांना तातडीने सरसकट आर्थिक मदत जाहीर करण्याबाबत मागणी करणार

सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला तालुक्यात सर्वत्र ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतरही पावसाचे थैमान कायम असून यामध्ये तालुक्यातील बहुतांश पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला आहे. घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझड होवून काही कुटुंबे बेघर झाले आहेत. शेतातील उभी पिके, फळबागा उध्वस्त झाले आहेत. तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून, शेती आणि बळीराजाला वाचवण्यासाठी सांगोला तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा याबाबत कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आग्रही मागणी करणार आहे. यासह शेती पिके व फळ पिकांचे योग्य ते पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत शासनाकडे केली.
नेहमी पाणीटंचाईचा तालुका म्हणून चर्चेत असणाऱ्या आणि दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत तालुका जलमय करून टाकला आहे. पावसाच्या पाण्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि गावचा संपर्क तुटला आहे. नागरिक वस्तीमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेचा कणा असलेला आपला शेतकरी वर्ग मात्र यामुळे मोठ्या चिंतेत आहे. बळीराजाची अश्रू पुसण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त सदृश्य परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी तालुक्यातील बळीराजाची अवस्था सध्या “ना घर ना घाट का” अशी झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसामुळे शेतीचे खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नेहमी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला आता याच पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतले आहेत. यामुळे त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ढगफुटी सदृश्य परिस्थितीबाबत संपूर्ण सांगोला तालुका दौरा करणार आहे. तसेच त्याबाबत शासनाला तातडीने मदत देण्याबाबत आवाहन करणार आहे.
तालुक्यातील डाळिंब, केळी, आंबा, द्राक्षे या फळबागायत पिकासह मका, सूर्यफूल, बाजरी, तूर, कांदा आणि भाज्या यांसारख्या बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. याशिवाय काढणीला आलेल्या मका, तूर, बाजरी या पिकाला मान्सूनच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. काढणी झालेली पिके पाण्यावर तरंगू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणवले असून, तालुक्यातील शेती आणि बळीराजा वाचवायचा असेल तर सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाकडून योग्य ते पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करणार आहे. असे ही मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.
तालुक्यावर आलेल्या अस्मानी संकटात बळीराजाला आधार देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बळीराजाचे अश्रू पुसून धीर देण्याचे काम केले आहे. याबाबत सरसकट आर्थिक मदत मिळावी या दृष्टीने तालुक्याचा एकंदरीत परिस्थितीचा आढावा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना सांगितला असून, ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत लवकरच सांगोला पाहणी दौरा काढावा याबाबत ही मागणी करण्यात आली आहे. तत्पूर्वी सांगोला तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी ही आमची आग्रही भूमिका असणार आहे.
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील



