“मेडशिंगी, सांगोला: उघड्या दरवाजाचा फायदा घेत ५२ हजारांचे दागिने चोरीला”

सांगोला (तालुका प्रतिनिधी):
घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून ५२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास मेडशिंगी ता. सांगोला येथे घडली. याप्रकरणी प्रमोद गोरख इंगोले यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रमोद गोरख इंगोले रा. मेडशिंगी ता. सांगोला हे २८ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास जेवणखाण करुन आतील खोलीमध्ये झोपी गेले होते. तर वडील बाहेर अंगणात झोपले होते. प्रमोद यांचा मोठा भाऊ प्रविण हा घराच्या हॉलमध्ये झोपला होता. त्यावेळी त्याने घराचे दार उघडे ठेवले होते. रात्री एकच्या सुमारास घरातील कपाट वाजल्याने प्रमोद यांना जाग आली. त्यावेळी त्यांनी उठून पाहीले असता घरातून एक अज्ञात इसम पळत बाहेर गेला. त्यावेळी प्रमोद यांनी त्याचा पाठलाग केला परतू तो अंधाराचा फायदा घेत पळून गेला.
दरम्यान, प्रमोद इंगोले यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने पाहीले असता, ते कपाटात मिळून आले नाहीत. अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दारातून प्रवेश करुन कपाटातील ८ हजार रुपये किमतीचे २.६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुबे, ७ हजार रुपये किंमतीचे १.९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी, ७ हजार रुपये किंमतीचे १.९ ग्रॅम वजनाचे सोन्याची बाळी, ३० हजार रुपये किंमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे गंठण असा ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खात्री झाली.