सांगोला पोलिसांची मोठी कारवाई: ८ चोरीच्या मोटारसायकलींसह आरोपी जेरबंद

सांगोला (प्रतिनिधी)
सांगोला शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या घटनांना प्रतिबंध घालणे आणि आधी झालेल्या गुन्ह्यांचा तपास लावणे यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलीसांना कठोर निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर सांगोला पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. २४५/२०२५, बी एन एस कलम ३०३(२) अंतर्गत सुरू असलेल्या तपासादरम्यान पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, जत तालुक्यातील काही संशयित सांगोला शहरात येऊन मोटारसायकल चोरी करतात. यावरून विशेष पथकाची स्थापना करून हे पथक दोन दिवस जत तालुक्यात पाळत ठेवून संशयितांचा शोध घेत होता.
यावेळी लक्ष्मीनगर, उमराणी तांडा, जत, ता. जत, जि. सांगली येथील गोविंद उर्फ पवन राजू काळे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सांगोला, पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ५ बुलेट व ३ इतर अशा एकूण ८ मोटारसायकली (एकूण किंमत सुमारे ६.२० लाख रुपये) जप्त करण्यात आल्या.
सदर जप्ती दरम्यान पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यांचे अभिलेख तपासून सदर मोटारसायकली चोरीस गेलेल्या असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास पोलीस नाईक बाबासाहेब पाटील करीत असून मोटारसायकली पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी श्री. विकांत गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/१४२५ बाबासाहेब पाटील, पोकॉ/३३५ लक्ष्मण वाघमोडे व सायबर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ/०५ युसूफ पठाण यांनी केली.