
सांगोला प्रतिनिधी :
सांगोला पोलिस ठाण्याची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी (ता. २२) तपासणी केली. या तपासणीदरम्यान त्यांनी पोलिस ठाण्याच्या एकूण कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासमवेत सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक अंजनी कृष्णा व्ही. एस, सांगोल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे आदी उपस्थित होते.
तपासणी दरम्यान सांगोला पोलिस ठाण्यात नव्याने उभारलेल्या ओपन जिम, व्हॉलिबॉल मैदान आणि ग्रीन पार्कचे उद्घाटन फुलारे यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिस ठाण्यातील दप्तर तपासणी करून पोलिसांचे संवाद साधला. पोलिसांच्या अडचणी जाणून घेऊन तर सोडविण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सुनील फुलारी यांचा नागरी सत्कार
■ शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना फुलारी म्हणाले, सांगोल्याच्या या सत्काराने मी भारावून गेलो आहे. सांगोला हे डाळिंबासाठी प्रसिद्ध असले तरी सोन्यासारख्या माणसांनी भरलेले आहे.