सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी करा…
२६ जानेवारी रोजी रवींद्र कांबळे यांनी केले आंदोलन

सांगोला (प्रतिनिधी) :-
सांगोला शहरांमध्ये सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी बहुजन समाज क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी २६ जानेवारी रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण केले आहे.
सदर उपोषण ठिकाणी आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आ. दीपक (आबा) साळुंखे- पाटील, डॉ. अनिकेत देशमुख, सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी, तहसीलदार संतोष कणसे यांच्यासह सांगोला शहरातील माजी नगरसेवक, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख व माजी आ. दीपक (आबा) साळुंखे -पाटील यांनी उपोषणाबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली व अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे सूचना दिल्या. सांगोला शहरात सध्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून सदरचे काम करीत असताना कामाचा दर्जा व गुणवत्ता बाबत नागरिकांमधून तक्रारी आहेत, हे काम करीत असताना वापरण्यात येणारे साहित्य पाईप, सिमेंट, चेंबर बांधकामासाठी वापरण्यात येणारी विटा याची गुणवत्ता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आहे का ? नाही तसेच सदर काम करत असताना बांधकामासाठी वापरलेली वाळू ही बेकायदेशीर (चोरीची ) आहे का ? याची चौकशी करावी.
तसेच पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यावरती खड्डे माती दगड जसेच्या तसे ठेवल्यामुळे छोटे- मोठे अपघात झाले आहेत, तरी त्वरित रस्ता ठेकेदाराने करणे गरजेचे असताना ठेकेदार मनमानी करीत आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. तरी संबंधित कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी , या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर २६ जानेवारी रोजी बहुजन समाज क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले.
सदर कामाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रव्यवहार करून चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
चौकट-:-
सदर भुयारी गटार कामाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलेला असून संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करावी. ठेकेदाराने व नगरपरिषदेने ताबडतोब रस्ता दुरुस्त करावेत.
शहरात प्रचंड धूळ असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, उकरलेल्या रस्त्यावर पाणी मारावे, रहदारीचे रस्त्यावर काम करताना नागरिकांची गैरसोय होऊन नये , याची काळजी घ्यावी. चेंबरचे बांधकाम झाल्यावर पाण्याच्या वापर करावा, जेणे करून त्याची भक्कमता टिकून राहील, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार.
रवींद्र कांबळे