मोफत प्रवेश…२६६२ जागांसाठी ५५८३ विद्यार्थ्यांची नोंदणी
२८६ शाळा सहभागी, २५ टक्केअंतर्गत प्रवेश प्रक्रियेची मुदत २ फेब्रुवारीपर्यंत

मोफत प्रवेश…२६६२ जागांसाठी ५५८३ विद्यार्थ्यांची नोंदणी
२८६ शाळा सहभागी, २५ टक्केअंतर्गत प्रवेश प्रक्रियेची मुदत २ फेब्रुवारीपर्यंत
सांगोला (प्रतिनिधी):
महाराष्ट्र सरकारने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खाजगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत (आरटीई) वाढवली आहे. पालकांना आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाच्या योजनेला प्रतिसाद वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील २८६ शाळांमध्ये २ हजार ६६२ जागांसाठी ५ हजार ५८३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेशासाठी प्रक्रिया राबविली जात आहे. या अंतर्गत नोंदणीकृत शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. या योजनेअंतर्गत प्रवेशासाठी पालकांना आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बालकाचे जन्म प्रमाणपत्र आणि राहण्याचा पुरावा, अशी कागदपत्रे सादर करावी लागतात. यासाठी बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी शासनाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील २८६ शाळांनी यावेळी पोर्टलवर नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये असलेल्या २ हजार ६६२ जागांसाठी यंदा प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पालकांना आता २ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
या योजनेच्या नोंदणीची मुदत सोमवारी (ता. २७) संपुष्टात येणार होती. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागाची संधी मिळावी, या उद्देशाने नोंदणीप्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने सोमवारी जारी केला. शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने पारित आदेशानुसार रविवार २ फेब्रुवारी पर्यंत वाढीव मुदतीत पालकांना त्यांच्या पाल्याचा अर्ज संकेतस्थळावर भरता येईल. सद्यस्थितीत एका जागेसाठी तीन अर्ज या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत अर्जसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडली.
सोलापूर जिल्ह्याची स्थिती
सहभागी शाळांची संख्या : २८६
प्रवेशासाठी उपलब्ध जागा: २ हजार ६६२
दाखल ऑनलाइन अर्ज : ५ हजार ५८३
यंदा प्रवेश प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशाची प्रक्रिया १४ जानेवारीपासून सुरू झाली आहे. अगोदर २७ जानेवारीपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार होते. मात्र, आता त्यात वाढ करण्यात आली असून २ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.