टमटम आणि दुचाकीची धडक ; अपघातात माय लेकरांचा दुर्दैवी मृत्यू

सांगोला / तालुका प्रतिनिधी
जनावरे वाहतूक करणाऱ्या टमटमने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर, उपचारादरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या आईनेही अखेरचा श्वास घेतल्याने या अपघातात माय लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघेही कटफळ ता सांगोला येथील रहिवासी आहेत.
धनाजी लक्ष्मण दुधाळ -३२ हा तरुण या अपघातात जागीच मयत झाला होता तर आई केराबाई लक्ष्मण दुधाळ यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हा अपघात काल रविवार २३ मार्च रोजी दुपारी १२ च्या सुमारास एखतपूर – अचकदाणी रोडवरील ( बागलवाडी मठवस्ती जवळ घडला. अपघातानंतर टमटम चालकाने टमटम जागेवर सोडून धूम ठोकली. याबाबत, शिवाजी दादू दुधाळ रा कटफळ ता सांगोला यांनी पोलिसात खबर दिली आहे .
याबाबत , मृत धनाजी दुधाळ हा आपली आई केराबाई दुधाळ, पत्नी लक्ष्मी दुधाळ असे तिघेजण मिळून दुधाळवाडी येथून रविवारी सकाळी ११ च्या सुमारास एम एच -४५ -ए वाय-७४४२ या दुचाकीवरून मुलगा दादा दुधाळ यास सांगोला येथील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन निघाले होते. नेमके त्यावेळेस एम एच -११- डीडी- २६३३ हा टमटम सांगोला येथील जनावराच्या बाजारात जनावरे खाली उतरून परत सांगोला एखतपूर मार्गे म्हसवड जि सातारा गावाकडे भरधाव वेगाने निघाला होता. वाटेत एखतपुर -अचकदाणी रोडवरील बागलवाडी मठवस्ती याठिकाणी टमटमने दुचाकीला समोरुन जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात धनाजी दुधाळ याच्या डोक्यास व छातीला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. केराबाई दुधाळ यांच्या डोक्याला मार लागून पायही फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तसेच मयत धनाजी दुधाळ यांच्या पत्नी लक्ष्मी दुधाळ व मुलगा दादा दुधाळ जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल अनिल बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी मदत करुन अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
फोटो ;