महाराष्ट्र

सोलापूरचा ढाण्या वाघ आता ठाण्यात गाजणार ; ॲड. अमित आळंगे यांची….

सोलापूरचा ढाण्या वाघ आता ठाण्यात गाजणार ; ॲड. अमित आळंगे यांची….

येथील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अमित आळंगे यांची ठाण्याच्या कौटुंबिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली असून येत्या ३ फेब्रुवारी रोजी ते पदभार घेणार आहेत.

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली १७ वर्षे वकिली केल्यानंतर ॲड. अमित विश्वनाथ आळंगे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. शालेय शिक्षण सिद्धेश्वर प्रशालेतून तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेजमधून घेऊन त्यांनी पुढे तेथेच बी.एस.एल.एल.बी.चे शिक्षण घेतले.

अमित यांना आपले वडील अॅड. विश्वनाथ आळंगे यांच्याकडून वकिलीचे बाळकडू मिळाले. २००८ पासून त्यांनी आपल्या वकिली व्यवसायास प्रारंभ केला.

सध्या ते सोलापूर जिल्हा न्यायालय येथे दिवाणी फौजदारी कौटुंबिक, ग्राहक मंच, शाळा न्यायाधिकरण, ट्रस्ट न्यायालयात वकिली व्यवसाय करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे वडील अॅड. आळंगे यांनी हे १९८० ला सुरू केलेल्या आळंगे लॉ क्लासेसमध्ये २००८ पासून विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. ते वकिली व्यवसायात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

सोलापूर बार असोसिएशनमध्ये ते खजिनदार व सचिव झाले. अनेक शासकीय, प्रशासकीय, खाजगी नामवंत संस्थांवर पॅनल अॅडव्होकेट म्हणून कार्यरत होते. त्यांनी सोलापूर बार असोसिएशन येथे विक्रमी मतांनी निवडून येऊन सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून मान मिळवला. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उपक्रम राबविले. सध्या ते लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा बार असोसिएशनतर्फे निरोप समारंभ पार पडला‌.

ॲड. अमित आळंगे यांनी सोलापुरातील विधीसेवा प्राधिकरण, सोलापूर महापालिका, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व सिद्धेश्वर देवस्थान, गोकूळ शुगर, सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना, कंचेश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूर सेकंडरी स्कूल, एम्प्लॉईज को. ऑप. सोसायटी अशा अनेक संस्थांवर पॅनेल ॲडव्होकेट म्हणून काम केले आहे. पैसे कमविणे हा प्रमुख उद्देश न ठेवता अनेक गोरगरिबांना त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला मोठे यश मिळाल्याचे ॲड. आळंगे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button