उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांची कचरा कुंड्यांची पाहणी; कचरा पेटवू नये, सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश

सांगोला प्रतिनिधी :
सांगोला नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष मा. श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांसमवेत शहरातील विविध ठिकाणच्या कचरा कुंड्यांची संयुक्त पाहणी केली. या पाहणीदरम्यान शहरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा उचल प्रक्रिया, कचरा वेगळा करण्याची पद्धत तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
शहरातील काही ठिकाणी कचरा पेटवला जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत उपनगराध्यक्षांनी कचरा पेटवू नये, अशी कडक सूचना दिली. कचरा जाळल्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरते, हवा दूषित होते आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले.
तसेच शहरात साचलेला कचरा वेळेत उचलून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, कचरा कुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरे फिरू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित विभाग व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
ज्या ठिकाणी कचरा पेट घेत असल्याचे किंवा आग लागल्याचे आढळते, त्या ठिकाणी तातडीने कारवाई करावी. अशा ठिकाणी नगरपालिकेच्या जेसीबीच्या सहाय्याने कचरा नांगरून त्यावर पाणी मारून आग विझवावी व जेसीबी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय शहरातील कचरा कुंड्यांची गेटे दुरुस्त करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून कचरा टाकताना शिस्त राहील आणि गैरप्रकारांना आळा बसेल.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष इंगोले यांनी सांगितले की, येत्या पाच वर्षांत आदरणीय आमदार श्री. शाहाजीबापू पाटील, नगराध्यक्ष श्री. आनंदभाऊ माने तसेच माजी नगराध्यक्ष श्री. रफिकभाई नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा कुंड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शाश्वत नियोजन करण्यात येईल. सांगोला शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम व परिणामकारक करण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



