सांगोल्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती – ओला दुष्काळ जाहीर करण्याची माजी.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची मागणी

सांगोला प्रतिनिधी :
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती व फळबागांचे नुकसान झाले असून सांगोला तालुक्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सांगोला मतदारसंघाचे माजी. आमदार मा. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना माजी.आमदार साळुंखे पाटील म्हणाले की, तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी या फळबागांसह मका, बाजरी, तूर, कांदा, सूर्यफूल आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेली असून काढणीस आलेली पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, घरे पडझड होऊन काही कुटुंबे बेघर झाली आहेत.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधून नुकसानीचा संपूर्ण आढावा घेण्यात आला असून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
“नेहमी पाणीटंचाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या सांगोला तालुक्यात यंदा पावसाने जलमय परिस्थिती निर्माण केली आहे. शेतकरी वर्गाचा ‘हातातला घास’ हिरावला गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजाला वाचवण्यासाठी सांगोला तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करणे अत्यावश्यक आहे,” असेही माजी.आमदार साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले.
➡️ ढगफुटी सदृश्य परिस्थितीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री व कृषिमंत्री लवकरच सांगोला दौरा करणार.
➡️ तत्पूर्वी सांगोला तालुका ओला दुष्काळ घोषित करून सरसकट आर्थिक मदत द्यावी, ही आमची ठाम भूमिका –
माजी.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील.



