जमीन बिगरशेती करतो म्हणून पत्रकारानेच केली लाखोंची फसवणूक ; जगन्नाथ साठे यांच्यावर गुन्हा दाखल

जमीन बिगरशेती करतो म्हणून पत्रकारानेच केली लाखोंची फसवणूक ; जगन्नाथ साठे यांच्यावर गुन्हा दाखल
सांगोला / तालुका प्रतिनिधी
हॉस्पिटलची जागा बिगर शेती करून देतो असे म्हणून ६ लाख ७१ हजार रुपये घेतले.परंतु जागा बिनशेती केली नाही तसेच घेतलेले पैसेही परत केले नाहीत उलट मी पत्रकार आहे तुमचे हॉस्पीटलची पेपरमध्ये बातमी छापून बदनामी करतो असे म्हणुन दमदाटी करून फसवणुक केली असल्याप्रकरणी सांगोला येथील जगन्नाथ तुकाराम साठे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असल्याची घटना घडली आहे.
डॉ. सुहास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मधील सर्व संचालकानी सांगोला शहरातील महुद रोड येथे १ हेक्टर ९ आर इतकी जागा हॉस्पिटल साठी घेतली आहे. या घेतलेल्या जागेवरती जागा बिगरशेती करून तिथे हॉस्पिटल बांधावयाचे नियोजन आहे. यासाठी सदरची जागा ही बिनशेती करावयाची होती याकरीता जगत्राथ तुकाराम साठे रा. धनगरगल्ली सांगोला यांचेत व दक्षताचे डॉ. शिवराज रामदास भोसले यांचेमध्ये दि.२२ मे २०२२ रोजी तोंडी करार होवून सदरची जागा बिनशेती करणेकरीता जगन्राथ साठे यांना ७ लाख रूपये देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे जगन्राथ साठे यांना दि.२४ मे २२ ते ८ एप्रिल २३ पर्यत वेळोवेळी ६ लाख ७१ हजार रुपये रोख स्वरूपात जगन्राथ साठे यांना दिले होते. बिगर शेतीसाठी आगाऊ रक्कम देऊनही जगन्नाथ साठे हे जागा बिनशेती करून देत नसल्याने दक्षता हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना वारंवार याबाबत विचारणा केली परंतु त्यांनी वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांचे काम टाळले. याबाबत दि.१२ फेब्रुवारी २५ रोजी हॉस्पिटल प्रशासनाने साठे यांना नोटीस पाठविली होती. त्यामुळे जगन्नाथ साठे हे दक्षता हॉस्पिटल यांचेवर चिडून होते. त्यांनी मी सांगोला येथील एका दैनिकाचा संपादक व पत्रकार आहे. तुमची मी तसेच माझे सहकारी पत्रकार यांचे मार्फत मिडीयामध्ये, वर्तमानपत्रामध्ये तुमची व तुमच्या दक्षता हॉस्पीटलची बातमी छापुन बदनामी करीन अशी दमदाटी केली असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अखेर या प्रकरणी सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.