महात्मा फुले जन आरोग्य योजना सक्षमपणे राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

महात्मा फुले जन आरोग्य योजना सक्षमपणे राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
सांगोला प्रतिनिधी–
महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यात सक्षमपणे आणि सुरळीतपणे सुरू राहावी तसेच गरजू रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी आज विधानसभेचे अध्यक्ष मा.ना. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच धर्मादाय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी तसेच खाजगी रुग्णालयांकडून होणारी आर्थिक फसवणूक थांबवावी, अशी मागणी केली. त्यांनी योजनेचा लाभ प्रत्यक्षात गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे मत मांडले.
या अनुषंगाने विधानसभाध्यक्ष मा.ना. राहुल नार्वेकर यांनी तातडीने याची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. धर्मादाय आणि खाजगी रुग्णालयांनी गोरगरीब रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळतील याची काळजी घ्यावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार सुनील प्रभू, आमदार भास्कर जाधव, आमदार कालिदास कोळंबकर आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध समस्यांवर चर्चा करत योजनेंतर्गत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्यामुळे लवकरच रुग्णालय व्यवस्थापन अधिक पारदर्शक होईल आणि गोरगरीब जनतेला आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.