ऑनलाईन जुगार सेंटरवर कारवाई; ११ जणांवर गुन्हे

सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस.यांनी अवैधरित्या चाललेल्या २ ऑनलाईन रुलेट जुगार सेंटरवर कारवाई करुन एकूण ११ जणांवर गुन्हे दाखल केले.
सांगोला पोलीस ठाणे हद्दीत चालत असलेल्या बेकायदेशीर विनापरवाना ऑनलाईन रुलेट जुगाराची गोपनीयरित्या बातमी मिळाली. त्यानुसार वेगवेगळी पथके तयार करून छापा टाकण्यात आला.
सांगोलास्थित शिवाजी चौक परिसरातील धान्य बाजार येथील एका खोलीत फिरोज सिकंदर मुल्ला (रा. मुजावर गल्ली, सांगोला) हा इसम ऑनलाईन जुगार अड्डा चालवित असल्याचे आढळून आले. त्यावेळी तेथे अक्षय विजय इंगोले (रा. मणेरी गल्ली, सांगोला) अनिल
भारत जाधव (रा.जयभवानी चौक, सांगोला) राजन उदयसिंह देशमुख (रा. देशमुख गल्ली, सांगोला) सोहेल तायर खतीब व अस्लम जाफर मुलाणी (दोघेही रा. भोपळे रोड, सांगोला) जैश रियाज मुजावर व मोहसीन इलाही खतीब (दोघेही रा. मुजावर गल्ली, सांगोला) विशाल शिवाजी गायकवाड (रा. भीमनगर, सांगोला) हे जुगार खेळत असताना मिळून आले आहेत.
दुसऱ्या एका खोलीत ज्ञानेश्वर उर्फ माऊली तानाजी गायकवाड (रा. सांगोला) हा सिध्दीविनायक ऑनलाईन या नावाने जुगार सेंटर चालवित होता. त्यास विजयसिंह पांडूरंग मिसाळ (रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) हा मदत करीत असल्याचे दिसून आले. या दोन्ही कारवाई दरम्यान एकूण ११ इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन दुचाकीसह ९ लाख ९५ हजार १६० रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.