राजकीय

पालकमंत्र्यांच्या दमदाटीचे राजकारण स्वाभिमानी सांगोला तालुका सहन करणार नाही 

स्वाभिमानी मतदार पालकमंत्र्यांना पुन्हा एकदा "सांगोल्याचा हिसका" दाखवणार 

सांगोला प्रतिनिधी :

संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर सांगोला तालुका हा राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत आणि शांत तालुका म्हणून ओळखला जातो. या शांतताप्रिय सांगोला तालुक्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दमदाटीचे राजकारण करत असतील तर सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी मतदार त्यांना मतपेटीतून उत्तर देतील असा इशारा सांगोल्यातील स्वाभिमानी मतदारांनी दिला आहे.

सांगोला शहरात भारतीय जनता पार्टीची जराही ताकद नसताना ऐनवेळी त्यांनी स्थानिक नेतेमंडळीवर दबाव आणून त्यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फोडून आपल्या पक्षात घेतला होता. यानंतर चिडलेल्या सांगोला शहरातील सर्वपक्षीय स्वाभिमानी मतदारांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना “सांगोल्याचा हिसका” दाखवला होता. यानंतर जयकुमार गोरे सांगोला शहर आणि तालुक्यात राजकीय हस्तक्षेप करणार नाहीत अशी संपूर्ण शहर आणि तालुका वासियांना अपेक्षा होती. मात्र, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक आत पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यातील राजकारणात ढवळाढवळ करून आपली दादागिरी सुरू केली आहे. तालुक्यात भारतीय जनता पार्टीची जराही ताकद नसताना महायुतीत त्यांनी तब्बल ९० हजार मते असणाऱ्या शहाजीबापूंच्या बरोबरीने तब्बल ३ जिल्हा परिषद गटातून त्यांनी आपले कमळ या चिन्हावर उमेदवार जाहीर केले आहेत. नुकत्याच आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी महायुती सोडून कोणत्याही लोकप्रतिनिधीला विकासासाठी निधी देणार नाही असा दम दिल्याने आता सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी मतदार चांगलेच संतप्त झाले आहेत. तुम्ही आमचे उमेदवार निवडून दिले तरच तुम्हाला विकासासाठी निधी मिळेल असा दम देऊन त्यांनी सांगोला तालुक्याच्या स्वाभिमानाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या दमदाटीच्या राजकारणाला सांगोल्यातील मतदार मतपेटीतून उत्तर देतील असा विश्वास सांगोला तालुका विकास आघाडीच्या मतदारांनी व्यक्त केला आहे.

नगरपालिका निवडणुकीत बलात्कार, आता मात्र विकासाचा साक्षात्कार 

गेल्या दोन महिन्यापूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भारतीय जनता पार्टी आणि पालकमंत्र्यांवर टीका करताना त्यांचे वागणे एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखे असल्याची घनाघाती टीका केली होती. परंतु, तेच माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे आता मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे आधी होता तो बलात्कार आणि आता झाला तो साक्षात्कार असेच यांचे वागणे असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button