आरेवाडी येथील दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा : प्रा. शिवाजीराव ओलेकर

कवठेमंकाळ प्रतिनिधी :
कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवाच्या बनामध्ये मंगळवार, दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास बहुजन समाजासह धनगर, वंचित, उपेक्षित, अल्पसंख्याक व ओबीसी समाज बांधवांनी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बहुजन नेते प्रा. शिवाजीराव ओलेकर यांनी केले आहे.
या मेळाव्याची तारीख मूळतः 28 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी ओबीसी यलगार मेळावा आयोजित असल्यामुळे आरेवाडी मेळाव्याची तारीख बदलून 30 सप्टेंबर रोजी घेण्यात आली आहे.
मेळाव्याच्या तयारीसाठी बिरोबा देवस्थान ट्रस्ट, पुजारी मंडळी, आरेवाडी ग्रामपंचायत, पोलीस पाटील तसेच तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते सक्रिय झाले असून मंदिर परिसरातील साफसफाई, मंडप व इतर सोयीसुविधांची तयारी जोरात सुरू आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांचे विचार ऐकण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने धनगर व बहुजन बांधव मेळाव्यात हजेरी लावतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी जत तालुक्याचे नेते भाऊसाहेब दुधाळ, सांगोला तालुक्याचे नेते पांडुरंग लवटे, भोजलिंग बंडगर, स्वप्नील ओलेकर, तानाजी शिंगाडे, बिरू कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.



