सांगोल्याचा आमदार लोकांच्या मदतीला धावून गेला – स्वतः पाण्यात उतरून केली मदत

सांगोला तालुका :
सध्या राज्यभर अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यातील कडलास गावासह परिसरातील अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही घरांचेही नुकसान झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी कडलास गावाला भेट दिली. सकाळी साधारण सातच्या सुमारास आमदार देशमुख यांनी पाण्याने बाधित झालेल्या भागाची पाहणी केली. त्यांनी केवळ परिस्थितीची माहिती घेऊन न थांबता, प्रत्यक्ष पाण्यात उतरून गावकऱ्यांसोबत समस्येची पाहणी केली.
यावेळी आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः जेसीबीच्या मदतीने तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न केले. गावकऱ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थता असताना आमदार स्वतः त्यांच्या मदतीला धावून आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले की, “आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तळागाळात जाऊन लोकांच्या मदतीला उभे राहिल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि कौतुकाची भावना निर्माण झाली आहे.”
कडलास गावात आमदार साहेबांनी दाखवलेले कार्य हे केवळ जनप्रतिनिधीचे कर्तव्य पार पाडणे नसून, खऱ्या अर्थाने लोकांसाठी धावून जाणाऱ्या जननेत्याचे उदाहरण ठरले आहे.



