शहाजीबापूंची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी; अर्ध्या तासात तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर
एकनाथ शिंदेंच्या 'ऑन द स्पॉट' निर्णयाचे सांगोलकरांकडून कौतुक

सांगोला प्रतिनिधी :
सांगोला येथे साकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आणखी ५० लाखांचा निधी मिळावा, अशी मागणी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीला ग्रीन सिग्नल देऊन एकनाथ शिंदे यांनी अवघ्या अर्ध्या तासात शहाजीबापूंनी मागणी केलेला ५० लाखांचा निधी मंजूर करून तसे आदेश काढले.
सांगोला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या
कामाचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ना. एकनाथ शिंदे बोलत असताना
भाषणादरम्यान आणखी ५० लाख रुपये निधी मिळावा, अशी मागणी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिठ्ठी देऊन केली होती. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी भाषण सुरू असतानाच सदरचा निधी मी येथून विमानात बसेपर्यंत मंजूर केला जाईल, असा शब्द उपस्थित हजारो सांगोलकरांना दिला होता.
ना. शिंदे यांनी जाहीर केलेला निधी अवघ्या अर्ध्या तासात मंजूर झाल्याचे पत्र माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्याने ना. शिंदे यांच्या ‘ऑन द स्पॉट’ निर्णयाचा अनुभव पुन्हा एकदा सांगोला तालुक्यातील जनतेला आला आहे.
ना. एकनाथ शिंदे दिल्या शब्दाला जगणारा नेता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला तालुक्यातील कामासाठी आजवर ५ हजार ५०० कोटींचा विकास निधी दिला. ज्या ज्या वेळी मी त्यांना निधीची मागणी केली त्या प्रत्येक वेळी त्यांनी मला कधीच रिकाम्या हाताने पाठवले नाही. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आणखी ५० लाखांची मागणी केली. तो निधीही त्यांनी तत्काळ मंजूर करून त्याचा मंजुरीचा आदेश काढला. म्हणूनच महाराष्ट्रातील जनता ना. एकनाथ शिंदे यांच्यावर मनापासून प्रेम करते.
शहाजीबापू पाटील, माजी आमदार, सांगोला
सांगोल्याच्या एमआयडीसीबाबतही दिला शब्द
सांगोला तालुक्यासाठी अत्याधुनिक एम.आय.डी.सी. सुरू व्हावी, अशी मागणी वारंवार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. तुम्ही फक्त मला जागा उपलब्ध करून द्या, सांगोला तालुक्यासाठी अत्याधुनिक एम. आय. डी.सी. मंजूर करण्याच्या सूचना मी राज्याच्या उद्योगमंत्र्यांना देतो. त्याचा पाठपुरावा आमदार आणि पालकमंत्र्यांनी करावा, असा शब्दही यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापू पाटील, उपस्थित मान्यवर आणि सांगोला तालुक्यातील नागरिकांना दिला.



