एस टी चालकाला मारहाण ; एकावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

एस टी चालकाला मारहाण ; एकावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा
सांगोला / तालुका प्रतिनिधी
जवळा ता. सांगोला येथे एस.टी. बस चालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याची घटना सोमवार (ता. 24) रोजी घडली. एस.टी. चालक सचिनकुमार पोपट गुदगे (वय – 38, रा. हातीद) यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून पृथ्वीराज प्रशांत देशमुख (रा. देशमुख वस्ती, जवळा) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी सचिनकुमार पोपट गुदगे (वय 38, व्यवसाय – एस.टी. ड्रायव्हर, रा. हातीद, ता. सांगोला) हे 2013 पासून सांगोला एस.टी. डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. सकाळी 10:30 वाजता बस जतवरून सांगोला मार्गावर बस (क्रमांक – एम. एच – 07, एल – 7358) घेऊन जात असताना जवळा गावाजवळील पाटील वस्तीजवळ एक वयस्कर प्रवासी उतरले. त्यानंतर बस पुढे निघाल्यावर पृथ्वीराज देशमुख या मोटार सायकलस्वाराने (क्रमांक – एम. एच -12, 1260) बस थांबवली. चालकाने बस बाजूला घेतल्यावर मोटारसायकलस्वार पृथ्वीराज देशमुख याने कोणतेही कारण न देता चालक सचिनकुमार गुदगे यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. बसमधील प्रवासी व विद्यार्थी परीक्षेच्या तणावात असल्याने त्यांनी बस पुढे घेण्याची विनंती केली. त्यामुळे चालकाने बस सांगोला येथे नेली व प्रवासी उतरवल्यानंतर हा प्रकार सांगोला बसस्थानक अधिकारी ए.टी.एस. तोंडे यांना कळविला. त्यानंतर त्यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.